ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. ते ७० वर्षांचे होते.

गायक-संगीतकार वासूदेव भटकर यांच्या घरी ३ ऑगस्ट १९४९ मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. १९७७ मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही काळापूर्वीच ते ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत दिसले होते. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे.

रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. ‘अश्रूंची झाली फूले’ हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. १९७७ ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. गेल्याच वर्षी रमेश भाटकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like