घराणेशाहीच्या मुद्द्यावरून दोन अभिनेत्रींमध्ये शाब्दिक चकमक

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आता दोन अभिनेत्रींमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. कंगना रणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तापसी पन्नूला ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हणून हिणवलं. त्यानंतर तापसीनेही तिला सडेतोड उत्तर दिलं आहे.

तापसीने ट्विटरवर म्हटलं, ‘बारावी आणि दहावीनंतर आता आमचेसुद्धा निकाल समोर आले आहेत असं मी ऐकलंय. आमचं ग्रेड सिस्टम आता अधिकृत झालंय का? आतापर्यंत तर नंबर सिस्टमवर एखाद्याचं महत्त्व सिद्ध व्हायचं’, असा उपरोधिक टोला लगावत तापसीने कंगनाची शाळा घेतली आहे.

“या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मी फक्त गमावू शकते. कारण मला माहितीये, उद्या ही मूव्ही माफिया गँग बाहेरून आलेल्या तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांसारख्या २० कलाकारांना समोर आणेल. आणि हे कलाकार फक्त कंगनालाच घराणेशाहीचा त्रास होतो पण आमचं करण जोहरवर प्रेम आहे असं म्हणतील. जर तुम्हाला करण जोहर इतका आवडतो, तर तुम्ही बी ग्रेड अभिनेत्री का आहात?

तुम्ही तर आलिया भट्ट आणि अनन्या पांडेपेक्षा चांगले दिसता. तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात. तरी तुम्हाला काम का मिळत नाही. तुमचं पूर्ण अस्तित्वच घराणेशाहीचा पुरावा आहे. या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही खूश आहात हे मला का सांगताय? मला माहितीये की भविष्यात असंच होईल आणि संपूर्ण सिस्टम मला वेडं ठरवेल”, असं कंगना या मुलाखतीत म्हणाली.

You might also like