अव्यक्त नात्याचा मोकळा श्वास ‘व्हेंटिलेटर‘
‘व्हेंटिलेटर‘ हा राजेश मापुसकर दिग्दर्शित चित्रपट नात्यांतील, विशेषत: मुलगा व वडिलांच्या नात्यातील अव्यक्त आणि हळवे कोपरे उलगडून दाखवतो. व्हेंटिलेटरवर असलेल्या (एका) वडिलांची गोष्ट सांगताना बाप आणि मुलाच्या नात्यातील गुंत्यांची कारणं आणि तो सोडवण्याचा सोपा उपाय चित्रपट सांगतो. या गंभीर विषयावर भाष्य करताना अतिशय हलकी फुलकी कथा, प्रवाही पटकथा, मातब्बर कलाकारांची मोठी फौज, उच्च निर्मितीमूल्यं आणि श्रवणीय संगीताच्या जोरावर चित्रपट खिळवून ठेवतो. नात्यातील गमती-जमती दाखवता हसवतो व त्याचवेळी गुंते सोडवून दाखवताना डोळ्याच्या कडा ओलावतो. आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, सुकन्या कुलकर्णी, सतीश आळेकर, छोट्या भूमिकेत प्रियांका चोप्रा अशा कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर ही कथा काळजाला भिडते आणि कायमची स्मरणात राहते.