या आठवड्यात प्रदर्शित होणार ‘हे’ मराठी चित्रपट

१. आसूड 

अन्यायाविरोधात संघर्षाची ठिणगी पेटवत शेतकऱ्यांच्या हितासाठी एका युवकाचा व्यवस्थेविरोधातला धडाकेबाज लढा दाखवणारा ‘आसूड’ हा चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत,राणा जंगबहादूर, अवतार गील,अमित्रीयान पाटील,रश्मी राजपूत हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा-पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत.

२. भाई – व्यक्ती की वल्ली 

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित भाई – व्यक्ती की वल्ली हा चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

उत्तरार्धात सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. पुलंचे लहानपण, आई-वडिलांचे संस्कार, भावंडांचे प्रेम, सुनीताबाईंचा त्यांच्या आयुष्यातील प्रवेश आणि कलाकार म्हणून पुलंचे घडत जाणे हे सगळे खूप सुंदर पद्धतीनं पहिल्या भागात पाहायला मिळाले. आता दुसऱ्या भागात पुलंची आणखी एक बाजू पाहायला मिळणार आहे. पुलंचं साहित्य, नाटकातलं योगदान ते उतारवयातील पु.ल. असा प्रवास उत्तरार्धात पाहायला मिळणार आहे.

३. लकी

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. अभय महाजन आणि दिप्ती सती यांच्‍या मुख्य भूमिका असणार आहेत. संजय जाधव म्हणाले, “व्हॅलेंटाईन्सच्या महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. तुमच्या संपूर्ण कुटूंबासोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकाल आणि तुमचं दोन तास भरपूर मनोरंजन होईल, याचा मला विश्‍वास आहे.”संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला ‘लकी’ ७ फेब्रुवारी २०१९ ला रिलीज होणार आहे.

४. प्रेमरंग 

शरद गोरे दिग्दर्शित  ‘प्रेमरंग’ हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी  प्रदर्शित होणार आह. जि.एस.एम. फिल्म्स निर्मित ‘प्रेमरंग’ या चित्रपटात शरद गोरे यांनी तब्बल नऊ भूमिका समर्थपणे बजावल्या आहेत. या चित्रपटात विनिता सोनवणे मुख्य नायिकेच्या भुमिकेत तर रमाकांत सुतार हा खलनायकाच्या भुमिकेत आहेत.

५. प्रेमवारी 

कॉलेज जीवनात प्रेमाची सफर करणाऱ्या राहुल आणि पूजाचा प्रवास ‘प्रेमवारी’ या चित्रपटामध्ये मांडण्यात आला आहे. राहुल आणि पूजा यांचं कॉलेजमध्ये फुलत जाणारं प्रेम, त्यांच्या प्रेमामध्ये अडसर ठरणाऱ्या काही गोष्टी, घरातल्यांचा विरोध यासारखे अनेक चढउतार आणि त्यावर या दोघांनी केलेली मात या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी देखील कॉलेज जीवन आणि त्यात होणारे प्रेम यावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले आहे. पण हा चित्रपट इतर चित्रपटापेक्षा नक्कीच वेगळा ठरणार आहे.

या चित्रपटात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. येत्या ८ फेब्रुवारीला म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले आहे.

६. रेडीमिक्स

प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच फेब्रुवारी महिन्याचे विशेष आकर्षण असते. ही प्रेमाची भुरळ घालण्यासाठी आपली आवडती जोडी लव्हरबॉय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे परत एकदा येत्या ८ फेब्रुवारीला एक नवीन रोमँटिक सिनेमा घेऊन येणार आहे. हा नवीन सिनेमा म्हणजे  ‘रेडीमिक्स’. या दोघांसोबत हरहुन्नरी अभिनेत्री नेहा जोशीही या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. 

प्रस्तुतकर्ते एव्हीके फिल्म्सचे अमेय विनोद खोपकरवेगळ्या धाटणीचे सिद्धहस्त चित्रपट निर्माते प्रशांत घैसासमालिका – चित्रपट निर्मितीतले कुशल निर्माते सुनिल वसंत भोसलेख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि सर्जनशील दिग्दर्शक जालिंदर कुंभार  इत्यादी दिग्ग्ज मंडळी एक प्रसन्न, टवटवीत आणि खुसखुशीत लव्हस्टोरीचा हा ‘रेडीमिक्स पॅक’ रसिकांच्या हाती सोपवणार आहेत.

आजच्या तरुणाईची, सरळ रेषेत नसलेली जीवनरेषा पडद्यावर उत्कंठेसोबतच अत्यंत देखण्या आणि रुचकर पद्धतीने सांगण्यासाठी हे दिग्गज एकत्र आले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे ८ तारखेला ‘रेडीमिक्स’  रोमँटिक धम्माल करणार आहे. तसेच या सिनेमाचं पोस्टरही पारदर्शिता झाला आहे.