छळाला कंटाळून ‘या’ तेलगू अभिनेत्रीची आत्महत्या

दाक्षिणात्य अभिनयसृष्टीतील छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रावणी कोंडापल्ली हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. देवराज रेड्डी नावाच्या एका व्यक्तीने तिचा गेल्या काही दिवसांपासून अतोनात छळ केल्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.मनसू ममता या टीव्ही शोमुळे श्रावणीला खूप कमी कालावधीत चांगली लोकप्रियता लाभली होती.
यानंतर तिने अनेक मालिकांमध्येही काम केले. एक गुणी अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मधुनगर येथील राहत्या घरी बाथरूमच्या सिलिंगला गळफास लावलेल्या अवस्थेत ती आढळून आली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
श्रीवणीच्या कुटुंबीयांनी या देवराज रेड्डी नावाच्या व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. टीक-टॉकच्या माध्यमातून श्रीवणी व या व्यक्तीची ओळख झाली. त्यांची मैत्रीही झाली होती. पहिल्यांदा तो एक चांगला व्यक्ती वाटला होता. मात्र, नंतर त्याने श्रावणीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे.