सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सकडून शिक्कामोर्तब

सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयला मदत करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांची जी एक फॉरेन्सिक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने सुशांतसिंह याची हत्या झालेली नसून ती एक आत्महत्याच आहे, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.

त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तथापि, सीबीआय आता सुशांतसिंह याला आत्महत्या करण्यास कोणी भाग पाडले याविषयी आपले तपास कार्य केंद्रित करणार आहे, असे संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात सीबीआयला वैद्यकीयदृष्टीने मदत करण्यासाठीच एम्स रुग्णालयातील तज्ज्ञांचे हे पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने सीबीआयला आपला अंतिम अहवाल सादर करताना ही आत्महत्येचीच केस असल्याचे शिक्‍कामोर्तब केले आहे. त्याच्या पोटात विषाचा अंश सापडलेला नाही असे या आधीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते.

सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांत याला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप केला होता. 14 जून 2020 रोजी सुशांत आपल्याच निवासस्थान मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मीडीयावर काही गटांनी सध्या मोठीच मोहीम चालवली असतानाच हा अहवाल आल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.

You might also like