सुधीर मुनगंटीवारांना पडली ‘अग्गंबाई सासूबाई’ची भुरळ

छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्यासाठी, जागरुकता निर्माण करण्यासाठी देखील जाहिरात किंवा मालिकांचा वापर केला जातो. अशीच ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भावली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या फेसबुकवर अतिशय लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आईचे महत्त्व किती असते हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ शेअर करत, जेव्हा एखाद्याच्या घरी, भाकरीचे चारच तुकडे आहेत… आणि खाणारी तोंड पाच आहेत, तर त्या घरातली एकच व्यक्ती मला भूक नाही…. असे म्हणते ती म्हणजे…. ‘‘आई’’ असे त्यांनी कॅप्शन दिले आहे.
या मालिकेत आई आणि मुलामधील नात्याची एक वेगळी बाजू मांडण्यात आली आहे. मालिकेतील आई ही तिच्या मुलासाठी खूप काही करत असते. तरी देखील तिच्या मुलाला ‘आई कुठे काय करते?’ असा प्रश्न पडतो. त्याच्या या प्रश्नाला उत्तर देणारा मालिकेतील एक भाग सुनील मुनगंटीवार यांनी शेअर केला आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’या मालिकेने सगळ्यांचीच मन जिंकली आहेत. या अगोदर स्मृती ईराणी यांनी देखील या मालिकेची दखल घेतली होती. आणि आपली पसंती दर्शवली होती.