रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार सुशांतच्या मृतदेहाचा…; सुब्रमण्यम स्वामींचा नवीन दावा

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून म्हणजेच सीबीआयकडून चौकशी करण्याच्या मागणीचा पाठपुरावा करणारे भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता आणखीन एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

सुरुवाती पासूनच शंका उपस्थित करणाऱ्या स्वामी यांनी आता सुशांतच्या मृतदेहावर करण्यात आलेल्या शवविच्छेदना संदर्भात शंका उपस्थित केली आहे. स्वामी यांनी सुशांतचे शवविच्छेदन झालेल्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे.

“सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. सी. आर. कूपर महापालिका रुग्णालयातील पाच डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केल्यास बरीच माहिती मिळेल. सुशांतचा मृतदेह रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रुग्णवाहिकेमधील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार पाय मुरगळलेल्या अवस्थेत होते. मृतदेहाचा घोट्याखालील पायाचा भाग हा मुरगळल्याप्रमाणे होता,” असं स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

स्वामी यांचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं आहे. १४ तासांमध्ये २० हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. स्वामी यांनी अशाप्रकारे यापूर्वीही सुशांतच्या आत्महत्येसंदर्भातील ट्विट केले आहेत.

सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी सुब्रमण्यम स्वामी प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिलं होतं. अखेर पाच ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने सीबीआय़ चौकशीसाठी मान्यता दिली.

You might also like