‘मुस्लिम नसूनही मला अजानच्या आवाजाने जाग येते’ सोनू निगमच्या ट्विटने सोशल मीडियावर चर्चेला उधाण
गायक सोनू निगम सध्या त्याच्या एका ट्विटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या या धार्मिक रुढी कधी थांबणार?’ असे ट्विट त्याने केले होते.
सोनूच्या या ट्विटला विरोध झाल्यानंतर त्याने पुन्हा एक नवे ट्विट केले. त्या ट्विटमुळेही अनेकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. ‘जेव्हा मोहम्मद पैंगबर यांनी इस्लामची स्थापना केली होती तेव्हा विजेची सोय नव्हती. तर मग, एडिसनच्या संशोधनानंतर हे चोचले कशाला हवेत..?’ असा प्रश्न सोनूने उपस्थित केला.
सोनूने या सर्व प्रकाराला गुंडगिरीचे नाव दिले आहे. जर कोणत्या मंदिरात किंवा गुरुद्वारामध्येही त्या धर्माचे आचरण न करणाऱ्या लोकांना उठवण्यासाठी अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जात असेल, तर त्यावरही माझा विश्वास नाही. सोनू निगम आणि त्याच्या या ट्विटचा सध्या सर्व स्तरांतून विरोध होत असून त्याच्या चाहत्यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.