पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवा – भाजपा

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम आणि आउटसायडर्सना मिळणारी वागणूक यावर वादंग उठला. त्यानंतर सुशांतचे वडील केके सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केली. कालांतराने अनेक राजकीय नेतेमंडळींनी देखील याबाबत भाष्य करण्यात सुरूवात केली आहे.

भाजपने आज एक अजब मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. सुशांतसिह प्रकरणाचा तपास विशिष्ट टप्प्यावर येईपर्यत पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं आहे त्यात ही मागणी केली आहे. पाहूया नेमकं काय म्हटलं आहे या पत्रात ?

प्रति,
मा. ना. श्री. उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई

विषय : सुशांतसिह आत्महत्या प्रकरणाचा तपास विशिष्ट टप्प्यावर येईपर्यत पोलिस आयुक्त श्री. परमवीर सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविणेबाबत…

महोदय,
केंद्र सरकारने सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे दिला आहे. आपण एबीपी माझाच्या मुलाखतीत व्यक्त होताना असे म्हणाला होतात की, सीबीआय काय इंटरपोलने जरी चौकशी केली तरी आमची काही हरकत नाही. त्यामुळे राज्य सरकार सीबीआय चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आणणार नाही असा मला विश्वास आहे व त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यास मदतच होईल.

परंतु सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ५० दिवस उलटून गेले असतानाही पोलिसांनी साधा एफआयआर देखील दाखल केला नाही. तसेच दिशा सालियनाच्या आत्महत्येनंतर ५० दिवसांनी या संदर्भातील माहिती असल्यास ती आम्हाला द्यावी असे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी काढले. यामुळे या दोन्ही प्रकरणांची चौकशी करणार्या  अधिकार्यांची भुमिका तसेच मुंबई शहराचे पोलिस आयुक्त श्री. परमवीर सिंग यांचीही भुमिका हलगर्जीपणाची राहिली आहे. या प्रकरणातील पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले जात आहेत अशा प्रकारची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.

त्यामुळे राज्य सरकार याबाबतीत कुठलीही लपवाछपवी करत नाही आहे याकरिता या दोन्ही पोलिस अधिकार्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व मुंबई शहर पोलिस आयुक्त श्री. परमवीर सिंग यांना हा तपास किमान विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी मी या पत्राद्वारे आपल्याकडे करीत आहे.

या संदर्भात आपण योग्य ते निर्णय घेतले नाहीत तर हे सर्व पोलिस प्रशासन सेवेतील अधिकारी असल्यामुळे मी केंद्रीय गृहमंत्र्याकडे या संदर्भात दाद मागेन याची आपण कृपया नोंद घ्यावी, ही विनंती.

धन्यवाद.
आपला
अतुल भातखळकर

You might also like