पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट ‘ती सध्या काय करते’

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं आपल्या सोबत असतं, मनातल्या कोपऱ्यात लपलेलं ! त्या खास व्यक्तिबद्दल नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो कि ती किंवा तो सध्या काय करत असेल ? सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ६ जानेवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि होणार सून मी या घरची मधून घराघरांत पोचलेली तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे तसेच झी मराठी वरील सा रे ग म प लिटिल चॅम्प मध्ये आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आर्या आंबेकर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पणकरत आहेत. ​नुकतीच पत्रकार परिषद पुण्यात पार पडली. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे निर्माते झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने, सहनिर्मात्या पल्लवी राजवाडे, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनय बेर्डे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, आर्या आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की,प्रत्येक जण किमान एकदा तरी प्रेमात पडतोच, आणि एकमेकांच्या  प्रेमात पाडण्यासाठी दोघांची गरज असते असं माझं ठाम मत आहे. कधीतरी मित्रांसोबत बसलेलो असताना हा प्रश्न खरंच डोकावतो की ती सध्या काय करत असेल ? आणि ह्याच भावनेला घेऊन हा चित्रपट बनवला आहे. अनुरागच्या भूमिकेत अंकुश आणि अभिनय, तन्वीच्या भूमिकेत तेजश्री आणि आर्या आहे.’ती सध्या काय करते’ या चित्रपटाची कथा प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची ही कथा आहे. त्यांच्या शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आजपर्यंतची. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कोणीतरी एक खास माणूस असतं. आपल्या मनात एक हक्काची जागा
असलेलं.  प्रेमकथेची खरी गंमत त्याच्या हळुवार उलगडण्यात असते आणि ह्या चित्रपटातून ती अनोख्या पद्धतीने मांडण्याचा सतीश राजवाडें यांनी प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार आहे. याशिवाय चित्रपटात सुकन्या कुलकर्णी- मोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत.

झी स्टुडिओज् चे निखिल साने आणि असंख्य प्रोडक्शनच्या पल्लवी राजवाडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे असून, पटकथा आणि संवाद मनस्विनी लता रवींद्र यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन राहुल भाटणकर आणि छायाआरेखन सुहास गुजराथी यांचं आहे . या चित्रपटात एकूण चार गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत निलेश मोहरीर, अविनाश – विश्वजित आणि मंदार आपटे यांनी. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही. हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

You might also like