संजय राऊतांचा सुशांतच्या वकिलांना टोला

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या  फॉरेन्सिक टीमने सीबीआयला आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावत, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. अहवालानंतर, नवीन फॉरेन्सिक पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी सुशांतचे वकील विकास सिंह  यांनी केली आहे.

यावर ‘आता सीबीआयवरही विश्वास नाही का?’, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या वकिलांना टोला लगावला आहे. ‘सुशांतच्या वकिलांनी नव्या पथकाची मागणी केली आहे, करू द्या. केजीबी, सीआयएची टीम आणली तरी हरकत नाही. यांच्या या मागणीचा अर्थ, त्यांचा आता सीबीआयवरही विश्वास उरला नाहीय. सुप्रीम कोर्टवरदेखील विश्वास नाहीय. काय बोलणार आता!’, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विकास सिंह यांना टोला लगावला आहे.

‘एका युवा अभिनेत्याचा मृत्यू होतो, ही घटना वेदनादायक आहे. त्याचा तपास नक्की करावा. आम्हाला त्यावर काहीच हरकत नाही. परंतु, पहिल्या दिवसापासून ठाकरे सरकारला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जाते आहे’, असे संजय राऊत  म्हणाले.

 

You might also like