सुशांतसिंग प्रकरणावरून रोहित पवार यांची भाजपवर टीका

आमदार रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर लगेच त्यांनी आपल्या ऑफिशिअल फेसबुक अकाऊंटवरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसारित केलेले निवेदन टॅग करून आदित्य यांना पाठिंबा व्यक्त केला होता.

आता आमदार रोहित पवार यांनी आपला मोर्चा भाजपकडे वळवला असून या प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे. अभिनेता सुशांतसिंह प्रकरणावरून भाजप नेत्यांच्या दाव्यांचा चांगलाच समाचार घेतला.

पवार म्हणाले,’ सुशांतसिंह राजपूत यांची हत्या झाल्याचं तुम्ही म्हणता आणि पुरावेही देत नाही. भाजपकडे जर या प्रकरणातील पुरावे असतील, तर त्यांनी ते महाराष्ट्र सरकार व पोलिसांना द्यावेत. पुरावे नसताना ते गंभीर आणि मोठी वक्तव्ये करत असतील, तर ते राजकारण करीत आहेत, हे माझ्यासारख्याच काय तर सर्वसामान्य नागरिकांनाही कळतं,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजप या प्रकरणात बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करत आहे. यामुळे सुशांतला न्याय मिळणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. न्यायपालिका आपली प्रक्रिया पार पाडेल. मात्र, यानिमित्ताने मुंबई पोलिसांवर भाजपाने अविश्वास दाखवणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

You might also like