65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना शुटिंगसाठी परवानगी

राज्यातील ठाकरे सरकारला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. कोरोनामुळे राज्यसरकारने ६५ वर्षावरील ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणात परवानगी नाकारली होती. वारंवार मागणी करूनही ही परवानगी मिळत नसल्याने ६५ वर्षे वयाचे कलाकार नाराज होते. या निर्णयाविरोधात कलाकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज न्य़ायालयाने त्यांना परवानगी दिली आहे.

३० मे रोजी राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वांनुसार ६५ वर्ष आणि त्यावरील वयोमान असलेल्या कलाकारांना चित्रीकरणाच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाला अनेक ज्येष्ठ कलाकारांनी नाराजी दर्शवली होती.

रोहिणी हट्टगडी, दिलीप प्रभावळकर, उषा नाडकर्णी यांनी आम्हालाही शूटींगला जाण्याची परवानगी मिळायला हवी. आम्ही खबरदारीच्या सर्व उपाययोजना करू, असे म्हटले होते. त्यामुळे आता मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर या ज्येष्ठ कलाकारांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

चित्रपट व टीव्ही कलाकार प्रमोद पांडे (70) आणि इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनच्या वतीने वकील अशोक सरोगी यांच्यामार्फत दाखल केलेल्या दोन याचिकांवर खंडपीठाने आज महत्वपूर्ण असा निर्णय दिला.

’65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी लागू असलेल्या इतर सर्व नियमावली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या पासष्टीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांनाही लागू असतील’ असेही न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि आर. आय. चगला यांच्या खंडपीठाने सांगितले.

You might also like