हाॅटस्टार- बाॅलिवूडचे आगामी 7 बिग बजेट सिनेमे दिसणार OTTवर

देशासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास साडेतीन महिन्यांपासून थिएटर व नाट्यगृह बंद आहेत. अशा परिस्थितीत काही सिनेमे डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित होत आहेत. हॉटस्टार लाइव्हच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आली.

हॉटस्टार लाइव्हच्या माध्यमातून हिंदीतील ७ बडे सिनेमे थेट ऑनलाईन रिलीज करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट, वरुन धवन, वाॅल्ट डिस्नी कंपनीचे चेअरमन उदय शंकर लाइव्हच्या माध्यमातून उपस्थित होते.

अक्षय कुमाराचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमा रिलीज होईल. अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’, आलिया भटचा ‘सडक 2’ सिनेमादेखील हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ सिनेमा देखील हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. तसेच कुणाल खेमूचा ‘लूट केस’ आणि विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज’ असे सात सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सर्व सिनेमांची घोषणा करताना त्यांचे पोस्टरदेखील लाइव्ह प्रदर्शित करण्यात आले.

भारतातील डिस्ने इंडिया प्रमुख उदय शंकर यांनी यावेळी सांगितलं की, हे सात सिनेमे २४ जुलै पासून ऑक्टोबर पर्यंत थेट ओटीटीवर रिलीज होणार आहेत. ‘दिल बेचारा’ हा हॉटस्टारवर रिलीज होणारा पहिला सिनेमा असून, या सिनेमाच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहण्यात येईल.

अक्षयने त्याच्या ‘लक्ष्मीबॉम्ब’ सिनेमाबद्दल सांगताना म्हटलं की, ‘साडी हा अतिशय सौम्य पेहराव आहे. जे कोणी साडी नेसून काम करतात त्यांच्याविषयी आधीपासूनंच मनात आदर होता मात्र हा सिनेमा केल्यानंतर तो आणखी द्विगुणित झाला आहे’. साडी नेसून शूटींग करताना ज्या अडचणी आला त्याबद्दल अक्षयने अनेक किस्से या दरम्यान शेअर केले.