‘या’ प्रसिद्ध गायकाच्या मुलाला कोरोनाची लागण

देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. बॉलिवूड कलाकार यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

ध्रुव असं त्यांच्या मुलाचं नाव असून मुंबईतील एका रेस्तराँचा तो मालक आहे. कोरोना बाबत स्वत: अभिजीतने याचा खुलासा केला.माझा मुलगा ध्रुव एका इंटरनॅशनल ट्रिपवर जाणार होता. या ट्रिपची तयारी तो करत होता. त्यापूर्वी गाइडलाईन्सनुसार त्याची कोरोना टेस्ट केली गेली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यानंतर त्याने स्वत:ला घरीच आयसोलेट केले आहे. ध्रुवमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आलीत. त्यामुळे त्याला रूग्णालयात भरती करण्याची वेळ आली नाही. केवळ त्याला थोडासा खोकला आणि सर्दीचा त्रास आहे. सध्या तो घरी राहून स्वत:ची काळजी घेतोय, असे अभिजीतने सांगितले.

दरम्यान, अभिजीत एका शूटिंगनिमित्त कोलकाताला गेले आहेत. त्यांनीसुद्धा स्वत:ची कोरोना चाचणी केली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलं. शूट सुरू होण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून क्रू मेंबर्स व शूटमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येते. त्यात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

गेल्या काही आठवड्यांत बॉलिवूडमधील अनेकांना कोरोना झाला आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. अनुपम खेर यांची आई, भाऊ, वहिनी व पुतणीचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्यासोबत अनेक सीरिअलच्या कलाकारांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

You might also like