…..म्हणून ‘दबंग ३’च्या सेटवर आहे मोबाईलवर बंदी

सलमान खानची मुख्य भूमिका असलेला दबंग फ्रेंचाईजीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दबंग २’ नंतर तब्बल सात वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

या चित्रपटात महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सलमानच्या कॉलेज जीवनातील प्रेयसीची भूमिका पार पाडणार असल्याचे म्हटले जात आहे.

या चित्रपटातील सईचा लूक सर्वांपासून लपवून ठेवण्यात आला आहे. ‘दबंग ३’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सईचा लूक लीक होऊ नये यासाठी मेहनत घेतली जात आहे. विशेष म्हणजे सलमानने सईचा लूक लीक होऊ नये म्हणून सेटवर मोबाईल फोनवर बंदी आणली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रीपटाच्या चित्रीकरणादरम्यान सईला सार्वजनिक ठिकाणी जाण्यासही बंदी आणली आहे. लवकरच सलमान स्वत: सईचा लूक सोशल मीडियावर शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.