शिवसेना मुद्दाम ‘त्या’ प्रसिद्धीच्या जाळयात अडकत आहे ; मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप

गेले २ दिवस अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांसह मुंबई शहरावर केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर कंगना देखील आपल्या मतावर ठाम असून निकामी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याने या वादाला वेगळे वळण दिले जात आहे,अशी भूमिका तिने मांडली.

सद्या ट्विटरसह प्रत्यक्षात देखील सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी तपासावरून सुरु झालेला हा वाद आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला दिलेल्या इशाऱ्यानंतर मराठी-अमराठी होऊ लागला आहे. यानंतर राज्यभरातून कंगनाच्या विरोधात, तसेच काही प्रमाणात समर्थनार्थ भूमिका देखील मांडल्या जात आहेत.

यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले असून, शिवसेना सद्याच्या उद्भवलेल्या प्रश्नावर गंभीर समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी काही किंमत नसलेल्या व्यक्तीच्या प्रसिद्धीसाठीच्या वक्तव्याच्या जाळ्यात मुद्दाम अडकत आहे. असा निशाणा त्यांनी शिवसेनेसह कंगना रणौतवर साधला आहे.

संदीप देशपांडेंनी काय आरोप लावले?

संदीप देशपांडे म्हणाले, “भाविकांच्या मंदिरात प्रवेशाला बंदी, लाखो लोक बेरोजगार आहेत, आरोग्य व्यवस्था चांगली नसल्याने हजारो लोकांचे बळी जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून काम करत असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. रेल्वेसेवा चालू नसल्यामुळे लोकांचे प्रवासाचे भयंकर हाल होत आहेत. या सर्व परिस्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न होत आहेत का? यावर विचार करायला हवा.”

“ज्या व्यक्तीची 5 पैशांची किंमत नाही अशी व्यक्ती काही वादग्रस्त वक्तव्य करत प्रसिद्धीसाठी जाळं फेकत आहे. यात जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही. तरीही शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकते आहे का? यामागे इतर सर्व विषयांवरील लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे का? लोकांना होणाऱ्या त्रासावरुन लक्ष हटवून या विषयावर लक्ष केंद्रीत करण्याचं हे षडयंत्र तर नाही ना याचा विचार माध्यमांनी आणि जनतेने करायला हवा,” असा आरोप देखील मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.

“मागील 2 महिन्यात एक हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिनीचा संपादक याच शिवसेनेचे वाभाडे काढत असताना आख्खी शिवसेना गप्प होती. मग आत्ताच या सगळ्याचा उद्रेक का होतोय याचा नक्की विचार करायला हवा. या षडयंत्रामध्ये कोणकोण आहे याचाही विचार करायला हवा. आपण सर्वजण सुज्ञ आहात याचा विचार नक्की करा” असे आवाहन देखील देशपांडेंनी केले आहे.

 

 

 

You might also like