सद्य परिस्थितीवर बोलताना महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली चिंता

चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी मराठी सिनेसृष्टीतील सद्य परिस्थितीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योगाला जोरदार फटका बसला आहे. अनेक मोठे चित्रपट लांबणीवर गेले आहेत. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत मराठी मनोरंजनसृष्टी कुठे उभी आहे? अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

एका मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले , ‘कोरोना आणि लॉकडाउनमुळे मराठी सिनेसृष्टीची आर्थिक स्थिती फारच बिकट झाली आहे. सध्या आपल्याकडे वेट अँड वॉचचाच पर्याय उपलब्ध आहे. सिनेमागृह सुरु होतील, प्रेक्षक येऊन चित्रपट पाहतील. आणि परिस्थिती सुधारेल अशीच अपेक्षा आपण करु शकतो. आपली स्पर्धा हिंदी सिनेसृष्टीशी आहे. पण या स्पर्धेत आपण मागे पडत चाललो आहोत. कारण मराठी प्रेक्षकच आपल्या चित्रपटांना प्रतिसाद देत नाहीत’. असे त्यांनी सांगितले.

मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांबद्दल बोलताना पुढे ते म्हणाले, ‘आपल्या प्रेक्षकांचा कल मराठी चित्रपटांऐवजी हिंदी पाहण्याकडे अधिक आहे. त्यामुळे या कोरोनाच्या फटक्यातून बॉलिवूड लवकर बाहेर पडेल. पण मराठीचं काही सांगता येत नाही. तसंच आता OTT प्लॅटफॉर्मवर देखील हिंदी चित्रपट आणि मालिकांचीच चलती आहे.

त्यात प्रादेशिक भाषांसाठी जी जागा होती ती पाश्चात्य चित्रपटांनी व्यापून टाकली, त्यामुळे तिथेही मराठी मनोरंजन क्षेत्र काहीसं मागे पडल्याचं दिसत आहे. ही परिस्थिती लॉकडाउन आणि कोरोनामुळे आणखी बिकट होत चाचली आहे.” अशा भावना महेश मांजरेकर यांनी व्यक्त केल्या.

 

You might also like