राजकारणातील 60 वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे – विक्रम गोखले

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे दिशा निर्देश जाहीर करत आहे. राज्यात काही अटी-शर्तींसह चित्रीकरणास मान्यता दिली आहे. मात्र 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर काम करता येणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
या निर्णयाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयावर गोखले यांनी चांगलीच आगपाखड केली. 65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने परवानगी द्यावी, असेही ते म्हणाले.
या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार याबाबतचा कायदा करणार असल्याचं बोललं जात आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे असा कायदा आणण्याआधी राजकारणातील 60 वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असा खोचक सल्ला विक्रम गोखले यांनी दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 48 हजार 916 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 13,36, 861वर पोहोचला आहे. यापैकी 4 लाख 56 हजार 071 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 24 तासांत कोरोनामुळे 757 लोकांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंत मृतांचा आकडा 31 हजार 358 वर पोहोचली आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आणि विषाणूंचं संक्रमण होण्याचा वेग वाढत आहे. 24 तासांस ICMR ने साधारण 4 लाख 20 हजार 898 लोकांची कोरोना चाचणी केली. गुरुवारच्या तुलनेत 68,097 नवीन लोकांची चाचणी करण्यात आली आहे.