मुंबईनं मला यशोदामाई सारखं सांभाळलं! जय मुंबई, जय महाराष्ट्र

अभिनेत्री कंगना रणौत हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवरच संशय घेत आरोप केले . तर, “मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशा आशयाचे ट्विट केले होते. दरम्यान, मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे,” असे ट्विट अभिनेत्री कंगनाने केल्यानंतर आता तिला चांगलेच लक्ष्य केले जात आहे.

कंगनाच्या या वक्तव्यावर मराठी चित्रपटसृष्टीसह राज्यातील सामान्य नागरिक देखील संताप व्यक्त करत असून अनेक राजकीय नेत्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. काही ठिकाणी तर तिच्या पोस्टरला काळे फासत चपलांच्या जोड्याने फटके दिले गेले. दुसरीकडे शिवसेनेने कंगनाला मुंबईमध्ये पाऊल ठेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली.यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना रणौतमध्ये शाब्दिक वाद चांगलाच वाढला, तो अगदी बाप निघेपर्यंत पोहोचला आहे.

तर, कंगना देखील आपल्या मतावर ठाम असून निकामी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याने या वादाला वेगळे वळण दिले जात आहे, अशी भूमिका तिने मांडली.काल रात्री तिने, “महाराष्ट्रातील माझ्या मित्रांचे आभार मागण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. त्यांना माझ्या बोलण्याचा रोख माहिती आहे. तसेच मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. मुंबईनं मला यशोदामाईसारखं सांभाळलं आहे. त्यामुळे माझ्या प्रेमाचा पुरावा देण्याची गरज मला वाटत नाही.जय मुंबई जय महाराष्ट्र!” असे ट्विट करत तिची भूमिका समजून घेऊन समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील यावर आता टीका केली असून त्यांच्या टीकेचा रोख हा शिवसेनेवर असून काही लोकांना वाचवले जात आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. नितेश राणे यांनी, ” अलर्ट ! अलर्ट! कंगना तर एक कारण आहे, SSR आणि दिशा प्रकरणावरून लक्ष हटवायचे आहे, बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे..बाकी काही नाही! ” अशी खोचक टीका केली आहे.

You might also like