सार्वजनिक स्वच्छतागृहास कंगना राणावतचे नाव; शिर्डीतील शिवसैनिक आक्रमक

कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. कंगनाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले असून शिर्डी शहरातील शिवसैनिकांनी तसेच शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शिर्डी नगरपंचायतीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाला कंगना राणावतचे नाव दिले आहे. तसेच कंगनाचा फोटो त्याठिकाणी चिटकविण्यात आला आहे.
मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय, गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची भीती जास्त वाटते, अशी वक्तव्य केल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिर्डी शहरातील शिवसैनिकांनी आणि शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कंगनाचा निषेध व्यक्त केला आहे. तिने केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत सार्वजनिक शौचालयावर लावण्यात आलेल्या कंगनाच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.