कंगना राणावतला बेकायदा बांधकामाबद्दल दोन वर्षांपुर्वीच दिली होती नोटीस

कंगना राणावत हिच्या मुंबईतील बंगल्यात जे अनाधिकृत बांधकाम झाले आहे, त्या संबंधात मुंबई महापालिकेने तिला दोन वर्षांपुर्वीच नोटीस दिली आहे आणि त्याच वेळी ती या नोटीशीच्या विरोधात कोर्टातपण गेली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे. कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम केवळ 24 तासांची नोटीस देऊन कसे पाडले असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्या पार्श्वभूमीवर महापालिका सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
28 मार्च 2018 रोजी तिला या बेकायदा बांधकामाविषयी नोटीस देण्यात आली होती. खार भागातील या बंगल्यात तिचे मनकर्णिका फिल्मचे ऑफीस आहे. तिची ही प्रॉडक्शन कंपनी अजून प्राथमिक अवस्थेत आहे. या बंगल्याच्या आवारात अनेक बांधकाम बदल तिने महापालिकेची अनुमती न घेताच केले असून हे बांधकाम आणि बदल मोठ्या स्वरूपाचे आहेत.
आपण आपल्या बंगल्यात कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केलेले नाही असे तिने आज जी अनेक ट्विट्स केली आहेत त्यात म्हटले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबर पर्यंत कोणतेही बांधकाम पाडू नये असा कोर्टाचा आदेश असताना आपल्या बंगल्यावर ही कारवाई कशी झाली असा तिचा आक्षेपाचा मुख्य मुद्दा होता.