कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही – अनिल देशमुख

अभिनेत्री कंगना रणौत हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवरच संशय घेत आरोप केले . तर, “मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशा आशयाचे ट्विट केले होते. दरम्यान, मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे,” असे ट्विट अभिनेत्री कंगनाने केल्यानंतर आता तिला चांगलेच लक्ष्य केले जात आहे.

कंगनाच्या या वक्तव्यावर मराठी चित्रपटसृष्टीसह राज्यातील सामान्य नागरिक देखील संताप व्यक्त करत असून अनेक राजकीय नेत्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. आता, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या विषयावर भाष्य केले आहे. ” कंगना रणौत यांनी मुंबई पोलिसांची केलेल्या या तुलनेमुळे त्यांना महाराष्ट्रासह मुंबईमध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं ते बोलले आहेत”. हा वाद आता वाढत असून खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी असे वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान,  कंगना रणौतने आणखी एक ट्विट करत खुले आव्हान दिले आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत पाऊल ठेऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिने या ट्विट द्वारे टीकाकारांसह संजय राऊत यांनाच अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.

तिने, “मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्याच्या ९ तारखेला मी येणार असून मुंबईमध्ये लँड होण्याची वेळ देखील मी पोस्ट करेन, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.” असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

 

 

You might also like