‘जय मल्हार’मध्ये रंगणार म्हाळसाकांत अवताराची गोष्ट

खंडेरायाच्या लोकप्रिय ‘टाका’मागची गोष्ट उलगडणार

जेजुरीधिपती खंडेराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. आपल्या अचाट पराक्रमांनी आणि कर्तृत्वाने रयतेचं रक्षण करणारा राजा अशी या खंडोबाची ओळख. खंडेरायांच्या चरित्रामधून आणि विविध आख्यायिकांमधून त्याच्या या पराक्रमांची माहिती वाचायला आणि ऐकायला मिळते. पृथ्वीवरील लोकांवर मणी आणि  मल्ल दैत्याचे वाढते अत्याचार संपविण्यासाठी आणि जनतेचं रक्षण करण्यासाठी महादेवाने मार्तंडाचा अवतार घेतला आणि मणी व मल्ल या दैत्यांचा वध केला. मल्लाचा संहार करणारा तो मल्हार अशी या जेजुराधिशाची ओळख. या मल्ल संहाराच्या विविध कथा लोकप्रिय आहेत. खंडोबाचा हा पराक्रम आणि त्याचा महिमा भक्त मोठ्या जल्लोषात साजराही करतात. मणी आणि मल्लाच्या या संहारासाठी खंडोबाने म्हाळसाकांत हा अवतार घेतला होता. खंडोबा हा शिवाचा  तर म्हाळसादेवी पार्वतीचा अवतार. जिथे शिव असतो तिथे शक्तीच्या रुपात पार्वती ही असतेच. मणी आणि मल्ल दैत्यांचा संहार करतांना शिवाला म्हणजेच खंडेरायाला या शक्तीची अदृश्य स्वरुपातील सोबत होतीच. पांढ-या शुभ्र घोड्यावर स्वार झालेले आणि  हातात खड्ग घेतलेले खंडोबा त्यांच्या सोबतीला तीक्ष्ण भाला घेतलेली म्हाळसा देवी पुढे आपला लाडका श्वान वाघ्या यांनी मिळून मणी आणि मल्लाचा वध केला असा हा प्रसंग सर्वश्रुत आहे.  हाच प्रसंग चितारणारी एक प्रतिमा घरोघरी पुजली जाते. अनेक ठिकाणी ती चांदीच्या पत्र्यात किंवा तांब्याच्या पत्र्यातही कोरलेली बघायला मिळते. धातूंमध्ये कोरलेली ही प्रतिमा खंडोबाचा टाक म्हणूनही ओळखली जाते. ही प्रतिमा निरखुन बघितल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यात  म्हाळसा खंडेरायाच्या मागे किंवा पुढे बसलेली नसून ती त्यांच्या सोबतीने घोड्यावर स्वार झालेली आहे. त्यांच्या बरोबरीने ती या दैत्यांशी लढते आहे. याचाच अर्थ ती शक्तीरुपाने खंडेरायाच्या सोबत आहे. त्यामुळेच या प्रतिमेचं एक विशेष महत्त्व आहे. आजवर प्रतिमेच्या रुपात असलेली ही गोष्ट पहिल्यांदाच एका भव्य दिव्य स्वरुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आजवर टाकामध्ये कोरलेल्या या प्रतिमेला पहिल्यांदाच चेहरा मिळणार आहे हे विशेष. आपल्या आराध्य दैवताचा हा पराक्रम आणि त्याचा हा ‘म्हाळसाकांत अवतार’ आणि त्यामागची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे जय मल्हार या मालिकेच्या दोन तासांच्या विशेष भागामधून.  याचसोबत म्हाळसा आणि बानूपैकी कुणाला आपल्या मूळ रुपाची जाणीव होणार या प्रश्नाचे उत्तरही या विशेष भागामध्ये बघायला मिळणार आहे. येत्या ८ जानेवारीला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत जय मल्हारचा हा दोन तासांचा विशेष भाग प्रसारित होणार आहे.

मणी मल्लाचा वध हा खंडोबाच्या चरित्रामधील एक महत्त्वाचा पराक्रम.  त्यामुळे ही कथा प्रेक्षकांना तेवढ्याच भव्य दिव्य रुपात बघायला मिळावी आणि ती कायम त्यांच्या स्मरणात रहावी अशाच पद्धतीने चित्रीत करण्यात आली आहे. मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी स्वतः या विशेष चित्रीकरणाची धुरा सांभाळत त्याचे दिग्दर्शन केले.

 

म्हाळसेला होणार मूळ रुपाची जाणीव

खंडोबा हे शिवाचं रुप तर म्हाळसा ही पार्वतीचं मूळ रुप. म्हाळसादेवींची दासी आणि सखी जयाद्रीने केलेले सेवेवर खुश होऊन तिला एक वचन दिलं होतं. महादेवांच्या मल्हारी अवतारात पार्वतीच्या सोबतीने जयाद्रीही खंडोबांची अर्धभार्या होईल. शिवाने जेव्हा खंडोबाचा अवतार घेतला तेव्हा पार्वतीच्या रुपातील म्हाळसा देवी त्यांची अर्धांगिनी बनली तर बानूच्या रुपात जयाद्री त्यांची अर्धभार्या झाली. ही गोष्ट जरी पार्वतीच्या इच्छेने घडली असली तरी या रुपातील म्हाळसा आणि बानूला त्यांच्या मूळ रुपाची जाणीव नाहीये.  यामुळेच म्हाळसा देवी बानूला खंडोबाच्या पत्नीचा अधिकार मिळण्याच्या विरोधात आहे. या दोघींना त्यांच्या मूळ रुपाची जाणीव व्हावी या हेतूने खंडेराय नारदमुनींकरवी आख्यानाचं आयोजन करतात ज्यात नारदमुनी अनेक दाखले देत या दोघींना सत्यापर्यंत पोहचविण्यात मदत करतात. या दोघींपैकी ज्या कुणाला आपलं मूळ रुप आधी कळेल तिच्यासोबत आपण कैलासाला जाणार असाही निर्णय खंडेराय घेतात. त्यामुळे या दोघींमध्ये मूळ रुप जाणून घेण्याची जणू चुरसच रंगली होती. या दोघींपैकी आता म्हाळसादेवीला तिच्या मूळ रुपाची जाणीव होणार असून त्यानंतर काय घडणार हेही बघणं उत्सुकतेचं ठरेल.

खंडेरायाच्या चरित्रातील या दोन महत्त्वाच्या घटना या रविवारी म्हणजेच ८ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता प्रसारीत होणा-या दोन तासांच्या या विशेष भागामधून बघायला मिळणार आहेत.

You might also like