‘बबड्याची सीरिअल पाहण्याऐवजी…’ ; रोहित पवारांनी शेलारांना सुनावले खडे बोल

अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायलाच हव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी खोचक शब्दांत सरकारवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेलारांना त्याच भाषेत उत्तर दिलं आहे.
‘आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. बबड्याची सीरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं. आता त्यासाठी किमान स्वत:च्या ट्वीटखालील रिप्लाय तरी वाचाल,’ असा टोला रोहित यांनी शेलारांना हाणला आहे.
एका मराठी टीव्ही मालिकेतील पात्राचा उल्लेख करत शेलार यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार…! ऐकतो कोण?,’ असं शेलार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी ट्वीटच्या माध्यमातूनच सडेतोड उत्तर दिलं आहे.
आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण @ShelarAshish जी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं.आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल. https://t.co/5rxIwyU2Rt
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 28, 2020