शिवसेना VS कंगना वादात आता राज्यपालांची उडी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्स रॅकेटवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यामध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे.
कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता यांच्याकडे या कारवाईबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली असून, त्याबाबतची माहिती राज्य सरकारला देण्याची सूचना राज्यपालांनी केल्याचे वृत्त आहे. तसेच राज्यपाल याबाबत राज्य सरकारविरोधात केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार, असल्याची माहिती टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
दरम्यान, कंगना राणौत वादामध्ये आपली काही भूमिका नसल्याचे भाजपाने म्हटले होते. मात्र आता या प्रकरणावरून राज्यपालांनी केंद्राकडे अहवाल पाठवण्याची तयारी केल्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद चिघळणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत कंगनासोबतच शिवसेना आणि भाजपामध्येही सामना रंगण्याची शक्यता आहे.