गायत्री दातारचं ‘या’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण

‘तुला पाहते रे’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यातच इशाची भूमिका वठविणाऱ्या गायत्री दातारला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता मालिका संपल्यानंतर गायत्री लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. गायत्री लवकरच राहुल भंडारे निर्मित ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नव्या नाटकात झळकणार आहे.
अद्वैत थिएटर्सचं हे बालनाट्य असून या नाटकाच्या माध्यमातून गायत्री रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने राहुल भंडारे, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी आणि चिन्मय मांडलेकर एकत्र आले आहेत.
या नाटकाची निर्मिती राहुल भंडारे यांनी केली असून दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर करत आहेत. तर रत्नाकर मतकरी यांनी हे नाटकं लिहिलं आहे.‘निम्मा शिम्मा राक्षस’मध्ये गायत्री दातार मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत अंकुर वाढवे आणि मयुरेश पेम हे रंगमंचावर झळकणार आहेत.
या नाटकातील तीन गाणी चिन्मय मांडलेकर यांनी लिहिली असून जसराज जोशीने ती स्वरबद्ध केली आहेत. तर मयूरेश माडगावकर यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत.