फिल्म इंडस्ट्रीकडून गोविंदासोबत अन्याय – शत्रुघ्न सिन्हा

सुशांतच्या आत्महत्येला आता दीड महिना उलटून गेला आहे. मात्र त्याच्या आत्महत्येनंतर सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सुशांतवर प्रस्थापितांकडून कसा अन्याय झाला आहे, इथपासून सुरू झालेला हा वाद घराणेशाही, अन्याय-अत्याचार आणि आता शेवटी बॉलिवूडच्या आतले आणि बाहेरचे या मुद्द्यावर येऊन अडकला आहे.

ज्येष्ठ अभिनेते व राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदासोबत अन्याय झाल्याची भावना व्यक्‍त केली.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, गोविंदाच्या करिअरचा पडता काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा इंडस्ट्रीने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. किशोर कुमार, सोनू निगम यांच्यासारखंच गोविंदानेही त्याचं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केले होते. अभिनय आणि डान्स यांचा उत्तम समतोल गोविंदामध्ये आहे. पण जेव्हा त्याची वेळ योग्य नव्हती, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही चित्रपटांचं काम सुरू होते, पण काही लोकांमुळे ते सुद्धा बंद करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनेत्री कंगना रणौतलाही पाठिंबा दिला होता. मी अनेक लोकांना पाहतोय, त्यांना मनात कंगनाविषयी ईर्षा असल्याने ते तिच्याविरोधात बोलत आहेत. आमच्या दयेशिवाय, आमच्या इच्छेशिवाय, कोणत्याही गटाचा भाग न बनता आणि कोणाच्याही आशीर्वादाशिवाय या मुलीने खूप काही मिळविले आहे. तिचे हे यश आणि तिची ही हिंमत पाहून लोकांना तिच्याविषयी ईर्षा वाटू लागली आहे, असे ते म्हणाले होते.

You might also like