‘या’ दिवशी सुरु होणार ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व

करोना विषाणूच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ‘रोल, कॅमेरा, ऍक्शन’साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा नियम व अटींसह सुरू झालं आहे.
विशेष बाब म्हणजे झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांच्या चित्रिकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे. दरम्यान, याचबरोबर आता कलर्स मराठी वाहिनीवरील ‘मराठी बिग बॉस’चा तिसऱ्या सीझन लवकरच येणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
कलर्स मराठीवर बिग बॉसचे पहिले आणि दुसरे सीझन कमालीचे लोकप्रिय ठरले होते. या दोन्ही सीझनने संपूर्ण महाराष्टात धुमाकूळ घातला होता. अभिनेते ‘महेश मांजरेकर’ यांनी आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने आणि स्पर्धकांच्या विविध टास्कमुळे हा कार्यक्रम चांगलाच गाजला.
दरम्यान, सध्या मालिकांचे शूटिंग जरी सुरू असले तरी नॉन-फिक्शन कार्यक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आपला मराठी ‘बिग बॉस’ हा शो पुढील वर्षी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.