‘दंगल गर्ल’ झायरा वसीमची बॉलिवूड मधून एक्सिट

‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. झायराने तिच्या फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. झायराने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झायराने कमी वयात आपली ओळख निर्माण केली. पाच वर्षांपूर्वी तिने अभिनयविश्वात पदार्पण केलं होतं. आता हे कलाविश्व सोडण्याचा निर्णय का घेतला याविषयीही तिने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सविस्तर लिहिलं आहे.

या पाच वर्षांत तिचं आयुष्य कशाप्रकारे बदललं याविषयी तिने सांगितलं. प्रसिद्धी, प्रेम सर्वकाही मिळालं. या क्षेत्रासाठी जरी मी योग्य असली तरी मी इथे खूश नाही असं ती म्हणते. ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असं तिने लिहिलं. या पोस्टमध्ये तिने कुराणचाही उल्लेख केला आहे. झायराने ही पोस्ट कोणाच्यातरी दबावाखाली येऊन लिहिली असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.