चुकभूल द्यावी घ्यावी नवी मालिका झी मराठीवर लवकरच…

‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या लोकप्रिय नाटकावर आधारित याच नावाची मालिका आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत तर त्यांच्या जीडीला आहेत लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने.

सुप्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक या मालिकेची निर्मिती करणार असून त्याचे दिग्दर्शन स्वप्ननिल जयकर करणार आहे तर पटकथा आणि संवाद मधुगंधा कुलकर्णीचे असतील. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ ही कथा राजाभाऊ आणि मालती या वयोवृद्ध दाम्पत्याची आहे. वय झालं असलं तरी या जोडीतील प्रेम आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कायम आहे. जसं प्रेम आहे तसंच या नात्यात एक खट्याळपणासुद्धा आहे. या वयातही राजाभाऊ मनाने अगदी तरुण आहेत आणि या मुद्यावरुन दोघांमध्ये प्रेमळ खटकेही उडतच असतात. राजाभाऊंचा हट्ट की मालतीने त्यांना तरुण म्हणावं आणि मालतीची इच्छा अशी की राजाभाऊंनी हा अट्टहास सोडावा. हाच धागा पकडून या मालिकेचा पहिला प्रोमोसुद्धा बनविण्यात आला आहे ज्यामधून या नात्यातील गंमतीची झलक बघायला मिळणार आहे.

या निमित्ताने श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेनंतर दिलीप प्रभावळकर पुन्हा छोट्या पडद्यावर मुख्य भुमिकेत बघायला मिळणार आहेत तर जुळुन येती रेशीमगाठी या मालिकेनंतर पुन्हा एका छानशा भूमिकेत सुकन्या मोने दिसणार आहेत. तसंच जोडी म्हणून हे दोन कलाकार प्रथमच एकत्र येणार आहेत त्यामुळे मनोरंजनासोबतच दर्जेदार अभिनयाची जुगलबंदीही या मालिकेतून बघायला मिळेल. या मालिकेचं शीर्षक गीत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी गायलं असून या निमित्ताने त्यांनीही एका मोठ्या काळानंतर त्यांनी मालिकेसाठी पार्श्वगायन केलं आहे.

You might also like