‘बाबो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक रमेश चौधरी यांच्या ‘बाबो’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

ट्रेलरची सुरुवातच मुळात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका सुंदर गावाचे चित्र दाखवत मंगलाष्टकाने होते. त्यात  भारत गणेशपुरे टी.व्ही. अँकरच्या भूमिकेत दिसतो. तर विनोदी भूमिका साकारणारे किशोर कदम यांची सयाजी शिंदे यांच्या बरोबर गावाकडची खुमासदार शैलीतील भांडणांची जुगलबंदी पहायला मिळते.

या गावाच्या अनेक समस्या आहेतच, पण त्याही पेक्षा मोठी समस्या एका नवविवाहित दाम्पत्याला आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे, मात्र त्यांचा जागरण गोंधळ झालेला नाही आणि दुसरीकडे गावात अवकाशातील यान कोसळणार असल्याची बातमी टीव्हीवर ऐकायला मिळते. त्यानंतर गावात एकच कल्लोळ निर्माण झाला आहे.