अनुराग कश्यपवर बलात्काराचा गुन्हा दाखल

चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हिच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कश्यप यांनी मात्र हा आरोप धुडकावून लावला आहे. मंगळवारी रात्री वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन पायलने ही तक्रार दाखल केली.
तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कश्यप यांच्या विरोधात कलम 376 (1) बलात्कार, 354 विनयभंग व जबरदस्ती, 341, 342 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा वर्सोवा पोलिसांनी तपास सुरू केला असून अनुराग कश्यप यांनाही चौकशीला बोलावण्यात येणार आहे असे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
कश्यप यांनी आपल्यावर वर्सोवा येथील यारी रोड भागातील एका सदनिकेत सन 2013 साली बलात्कार केला, असे पायल घोष हिचे म्हणणे आहे. हीच तक्रार घेऊन पायल ही ओशिवरा पोलिसांकडे गेली होती. पण त्यांनी तिला वर्सोवा पोलिसांकडे जायला सांगितले.
कश्यप यांनी आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार पायल घोष हिने आपल्या ट्विटर अकौंटवरही काल केली होती. तथापि, कश्यप यांनी मात्र हे आरोप धुडकावून लावताना, आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दल आपल्याला गप्प करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. केवळ बदनामी करण्याच्या उद्देशानेच आपल्याविररुद्ध ही खोटी तक्रार करण्यात आली आहे, असेही कश्यप यांनी म्हटले आहे.