शिबानीच्या टीकेवर अंकिताचं ठणकावून उत्तर

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडे आणि शिबानी दांडेकर यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. शिबानी सातत्याने रियाची पाठराखण करत असून यात तिने अंकितावर टीकास्त्र डागलं आहे.
अंकिता हे सारं प्रसिद्धीसाठी करत असल्याचं शिबानीने म्हटलं होतं. मात्र आता शिबानीला अंकिताने थेट उत्तर दिलं आहे. अंकिताने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली होती. अंकिताची ही पोस्ट वाचल्यानंतर शिबानीने अंकितावर टीकास्त्र डागत तू रियाचा इतका द्वेष का करतेस? हे सारं प्रसिद्धीसाठी सुरु आहे, असं शिबानी म्हणाली होती. त्यावर अंकिताने उत्तर दिलं आहे.
“२ सेकेंड्स ऑफ फेम, या वाक्यामुळे मला खरंच आज विचार करायला भाग पाडलं आहे. छोट्या पडद्यावरील झी सिने स्टार की खोज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी २०१४ साली कलाविश्वात पदार्पण केलं होतं. हा शो जवळपास ६ वर्ष टीआरपीमध्ये प्रथम क्रमांकावर होता. कालाकारांना मिळणार प्रेम हेच खरं प्रसिद्धीचं माध्यम आहे. त्यामुळे आजही पवित्र रिश्ताची अर्चना लोकांसोबत जोडली गेली आहे. अर्चनासोबत आजही माझी नाळ बांधली गेली आहे”, असं अंकिता म्हणाली.
पुढे ती म्हणते, “सुदैवाने मला मणिकर्णिका आणि बागी ३मध्ये काम करण्याची संधी मिळाली. गेल्या १७ वर्षांपासून मी छोटा पडदा आणि बॉलिवूडमध्ये एक कालाकार म्हणून काम करत आहे. परंतु, आज माझ्या मित्राला सुशांतला न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करते तर मी हे सारं प्रसिद्धीसाठी करते असं म्हटलं जातंय. पण हे का तर मी बॉलिवूडच्या तुलनेत छोट्या पडद्यावर जास्त काम केलं आहे म्हणून?”.छोट्या पडद्यावरील कलाकारांना कधीच कमी लेखू नकोस. तेथील कलाकारांवर कधीच टीका करु नकोस, कारण बॉलिवूड कलाकार जितकी मेहनत घेतात तितकी मेहनत छोट्या पडद्यावरील कलाकारही घेतात असं अंकिताने शिबानीला ठणकावून सांगितलं आहे.