कोरोनानंतर क्रीडा क्षेत्र भरारी घेईल – प्रवीण तरडे

सर्वसाधारणपणे लोक वाईट भूतकाळ विसरून जातात आणि नव्या जोमाने कार्यरत होतात. तसेच करोना महामारीचे संकट लवकरच दूर होईल आणि पुन्हा क्रीडा क्षेत्रास झळाळी मिळेल, असा विश्‍वास माजी राष्ट्रीय कबड्डीपटू आणि प्रसिद्ध सिनेकलाकार प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला.

“प्रो लीग’ हा कबड्डीचा आत्मा आहे. त्यामुळे उशिरा का होईना या स्पर्धा सुरू होतील. प्रेक्षकांशिवाय स्पर्धा होणे अशक्‍य आहे, कारण त्यांच्यामुळेच आम्हाला प्रसिद्धी आणि पर्यायाने चांगला पैसा मिळतो, असे मत कबड्डीपटू निलेश शिंदे याने व्यक्त केले.

स्पोर्ट्‌स इंडिच्या वतीने “करोनाचा क्रीडा क्षेत्रावर परिणाम आणि त्यावरील उपाय योजना’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कबड्डीपटू व अभिनेते प्रवीण तरडे, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू निलेश शिंदे, पूजा सहस्रबुद्धे आणि राज्याचे क्रीडा व युवक संचालनालयाचे सहसंचालक डॉक्‍टर जयप्रकाश दुबळे यांनी सहभाग घेतला.

करोनाकाळात राज्यातील क्रीडा शिक्षकांना नवीन बदलांविषयी आणि नियमांबाबत वेबिनारद्वारे अद्यावत माहिती देण्यात आली. टेबल टेनिसपटू पूजा सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले, यंदा आमच्या स्पर्धा कमी होणार आहेत. त्यामुळेच मोजक्‍या स्पर्धांमध्ये आपली कामगिरी कशी उंचावता येईल हे खेळाडूं पुढे मोठे आव्हान असणार आहे. स्पोर्टस इंडिच्या संचालिका सुप्रिया बडवे यांनी स्वागत केले आणि स्पोर्ट्‌स इंडिचे व्यवस्थापक श्रीपाद जवळेकर यांनी आभार मानले.

 

You might also like