आदित्य पांचोलीच्या अडचणीत वाढ

एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीकडून ई-मेलच्या माध्यमातून तक्रार आल्यानंतर आदित्य पांचोली विरोधात वर्सोवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आदित्य पांचोलीविरोधात मारहाण आणि शोषणाची तक्रार दाखल केली गेली.
‘ई-मेलद्वारे तक्रार मिळाल्यानंतर संबंधित अभिनेत्रीशी आम्ही संपर्क केला. ही घटना १२ वर्षांपूर्वींची असल्याने एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला पुरावे गोळा करावे लागतील. आदित्य पांचोलीच्या पत्नीला संबंधित घटनेबद्दल ठाऊक होतं, असं तक्रारीत म्हटलं आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
आदित्य पांचोली म्हणाला, ‘संबंधित अभिनेत्रीविरोधात मी आधीच अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अभिनेत्रीच्या वकिलांनी ६ जानेवारी रोजी माझ्याविरोधात बलात्काराचे खोटे प्रकरण दाखल करण्याची धमकी दिली होती. अब्रुनुकसानीचा दावा मागे घ्यावा यासाठी त्याने ही धमकी दिली होती. त्याचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता. हे पुरावे मी पोलिसांना आणि कोर्टात दिले आहेत. माझ्याविरोधात हा कट रचण्यात येत आहे.’