शिवछत्रपतींच्या जयघोषाचा वाद; रितेश देशमुखने दिली लक्ष्यवेधी प्रतिक्रिया

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून पुन्हा एकदा देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यसभेत नवनियुक्त सदस्य शपथ घेत असतानाच छत्रपतींच्याच वंशजांनी ‘ जय भवानी, जय शिवाजी’ म्हटल्यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्ली ते गल्ली राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला.

व्यंकय्या नायडु यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप करत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही असं भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नसून आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी समज दिली असल्याचं म्हटलं. महाराजांचा अपमान झालाच नाही तर राजीनामा देण्याचा आणि आंदोलनाचा प्रश्नच नसल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन केलं.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता अभिनेता रितेश देशमुख यानेही या प्रकरणावार बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्वीट करत ‘जय भवानी, जय शिवाजी…जय जिजाऊ, जय शिवराय,’ असं कॅप्शन लिहिलं आहे. दिल्लीतील प्रकरणानंतर वादंग निर्माण झालं असतानाच रितेश देशमुखने दिलेली ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.

 

You might also like