‘रेगे’ फेम आरोह वेलणकरला पुण्यात भर रस्त्यात दोघांकडून मारहाण

पुणे: दारू पिऊन दादागिरी करणा-या गुंडांनी सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हैदोस घातला असून कशाचीही भीती न बाळगता हे गुंड रस्त्यांवर सर्वसामान्य लोकांना त्रास देताना दिसतात. ‘रेगे’ या सिनेमातून प्रसिद्ध झालेला अभिनेता आरोह वेलणकर यालाही नुकतीच अशाच काही गावगुंडांनी मारहाण केली. महत्वाची गोष्ट म्हणजे रहदारीच्या रस्त्यावर हे प्रकरण सुरू असताना एकही व्यक्ती त्या गुंडांना अडवण्यासाठी समोर आला नाही. सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली.

पुणे येथील कर्वे रोडच्या एका हॉटेलजवळ आरोह वेलणकर त्याचा काही मित्रांची वाट बघत उभा होता. मागून एका कारने जोरात हॉर्न वाजवायला सुरूवात केली. त्यांना रस्ता द्यावा म्हणून आरोहने त्याची कार बाजूला घेतली. मात्र तरीही ते हॉर्न वाजवत राहिले. त्यामुळे कार बाजूला घेऊनही हॉर्न का वाजवतो असे आरोहने विचारले. त्यावर त्यांनी आरोहला शिवीगाळ सुरू केली. कार बाजूला घेऊनही त्या कारमधून उतरलेल्या काही जणांनी आरोहला घाणेरड्या शिव्या देण्यास सुरूवात केली. कारमधून उतरलेले दोघेही दारू पिऊन होते, असे आरोहने सांगितले.

त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यातील एकाने खाली उतरून आरोहला मारहाण केली. अशातच आरोहने कारच्या काचा बंद करून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आरोहच्या कारवर दगडही फेकले. कारला लाथाही मारल्या. मात्र इतका वेळ रस्त्यावरील लोक केवळ बघ्याचीच भूमिका घेत होते. काही वेळांनी ते निघून गेले. त्यानंतर आरोहने पोलिसात तक्रार दिली. प्रविण मोहोळ आणि संग्राम तांगडे यांनी आरोहला शिवीगाळ आणि मारहाण केली. आरोहने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रविण मोहोळला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार मात्र फरार झाला आहे.

You might also like